‘साई रुग्णवाहिका प्रकल्प
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात/रुग्णसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना प्रत्येकी एक याप्रमाणे सुमारे ५०० रुग्णवाहिका उपलब्ध करुन देवून ‘साई रुग्णवाहिका प्रकल्प’ राबविण्यासाठी येणा-या रुपये २५ कोटी खर्चास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
डॉ.हावरे म्हणाले, साई रुग्णवाहिका प्रकल्पामुळे राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना संस्थानच्या माध्यमातून उपलब्ध होणा-या रुग्णवाहिकांमुळे तातडीने वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे. परिणामी श्री साईबाबांचा रुग्ण सेवेचा हेतु साध्य होणार असून श्री साईबाबांच्या शिकवणीचा प्रचार होणार आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, अधिनियम, २००४ कलम १७ (२-ण) मध्ये मानव जातीचे कल्याण करणा-या किंवा मानवाला आपत्तीमध्ये सहाय्य करणा-या अन्य कोणत्याही उदात्त कार्याला चालना देण्यात येईल, अशी तरतूद आहे. सदर तरतूदीनुसार श्री साईबाबा संस्थानमार्फत महाराष्ट्र राज्यातील आरोग्य क्षेत्रात/रुग्णसेवेच्या क्षेत्रात कार्यत नोंदणीकृत (महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट १८६० नुसार नोंदणीकृत) संस्थेस प्रत्येकी एक याप्रमाणे ५०० रुग्णवाहिकांना प्रत्येकी रुपये ०५ लाख याप्रमाणे अनुदान देण्यात यावे. अशी रक्कम सदर संस्थेला न देता मागणी करणा-या संस्थेने महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीकडे आगाऊ रक्कम (रुपये ०५ लाख वजा करुन) भरावी व कागदोपत्री पूर्तता करावी. अशी रक्कम त्यांनी भरल्यानंतर संस्थानतर्फे रुपये ०५ लाख इतकी रक्कम अनुदान परस्पर कंपनीला देण्यात यावी. संबंधीत संस्थेशी करारनामा करुन घेण्यात यावा. रुग्णवाहिकेसाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा बोलेरो BS-IV हे मॉडेल निश्चित करण्यात यावे. प्रत्येक रुग्णवाहिकेस GPS System बसवून घेण्यात यावी. रुग्णवाहिकेच्या नोंदणी व विम्याची जबाबदारी संबंधीत संस्थेची राहील. रुग्णवाहिकेवर “श्री साई रुग्णवाहिका” असे नमूद करण्यात यावे, अशा अटी व शर्तींवर संस्थानच्या ५०० रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या ‘साई रुग्णवाहिका प्रकल्प’ उपक्रमासाठीच्या रुपये २५ कोटी निधीस शासनाने मान्यता दिली आहे.
वरील अटी व शर्तींस अधिनराहुन इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी संस्थानच्या वाहन विभाग दुरध्वनी क्रमांक (०२४२३) २५८७८७ व मो.नं.७७२००७७२५९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही डॉ.हावरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment