संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले
शिर्डी - श्री साईबाबांचा श्रध्दा आणि सबुरीचा संदेश संपुर्ण मानवतेला प्रेरणा देणारा असून श्री.साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने समाजसेवेसाठी करत असलेले शैक्षणिक, वैद्यकीय व अध्यात्मिक काम हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप, संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन, श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षाचे चांदीच्या नाण्याचे प्रकाशन आणि राज्यातील अडीच लाख घरकुलांच्या लाभार्थींना घरकुलाच्या चावीचे वितरण आणि राज्यातील इतर लाभार्थ्यांच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार रावसाहेब दानवे, दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व सर्व विश्वस्त उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपिनदादा कोल्हे, अॅड,मोहन जयकर, राजेंद्र सिंग व विश्वस्त तथा नगराध्यक्ष सौ.योगिताताई शेळके आदींनी संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लेंडीबागेतील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या ध्वजस्तंभाचे विधीवत पूजन करुन ध्वजावतरण करण्यात आले.
तसेच संस्थानच्या दर्शन रांग इमारत, शैक्षणिक संकुल इमारत, १० मेगावाट सौरऊर्जा प्रकल्प आणि साईसृष्टी प्रकल्पाचा शुभारंभ व श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षाचे श्री साई प्रतिमा असणारे चांदीच्या नाण्याचे अनावरण व लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात एक नाणे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना देण्यात आले. याबरोबरच श्री.मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रधानमंत्री आवास योजनेच्या १० लाभार्थ्यांना घरकुल प्रवेशाचा कलश आणि चाव्या प्रदान करण्यात आल्या व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील अडीच लाख लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश शुभारंभ करुन लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
यावेळी श्री.मोदी म्हणाले, श्री साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळयानिमित्ताने दर्शनाचा योग आला याचा मला अतिशय आनंद आहे. कोटयावधी लोकांची सेवा करण्याची आणि जनसेवेप्रती समर्पित होण्याची प्रेरणा श्री साईबाबांच्या सेवा संदेशातून मिळते. सर्व समाजाला एका सुत्रात बांधण्याचे सामर्थ्य त्यांच्या ‘सबका मालिक एक’ या मंत्रात आहे असे सांगुन ‘श्रद्धा असू द्या, सबूरी ठेवा, साईबाबाचा आशिर्वाद आपल्या सर्वांना लाभो ही साईचरणी प्रार्थना’ करुन श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षाचा समारोप श्री.मोदी यांनी केला.तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
Comments
Post a Comment